सोलापूर

Solapur News: अतिसाराचा रुग्ण अत्यवस्थ, तरीही पालिकेला नाही गांभीर्य

दूषित ड्रेनेज लाईन तत्काळ बदलण्याची रहिवाशांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आसरा चौकाजवळ असणाऱ्या एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीमध्ये काल जवळपास ४० रहिवाशांना अतिसाराची लागण झाली. त्यातील एक रुग्ण अत्यवस्थ झाला असून त्यांना यशोधरा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये बुधवारी दाखल करण्यात आले. यावर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी पाण्याचे नमुने घेतले असून तपासणीसाठी लॅबला पाठवले असल्याचे सांगितले.

या इमारतीमधील ४० जण अतिसाराने बाधित झालेले असून शहराच्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, परंतु येथील रहिवासी आयेशा शेख (वय ४६) यांची प्रकृती बुधवारी चिंताजनक झाल्याने त्यांना दुपारी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या संदर्भात या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी महानगरपालिकेकडे ही दूषित मलवाहिनी तत्काळ बदलून द्यावी, अशी मागणी केली तर त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी, महानगरपालिकेच्या संबंधित झोनकडून तेथील ड्रेनेज लाईनची तपासणी करण्यात येत आहे, ड्रेनेज लाईनचे पाणी बोअरमध्ये मिसळण्याची रहिवाशांची शंका आहे. ती शंका निरसन करण्यात येत आहे. तेथील ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित इमारतीतील पाणी हे पालिकेचे पाणी नाही. त्याठिकाणी तीन खासगी बोअर आहेत. खासगी बोअरमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले आहे. महापालिकेच्या पथकाने तेथील सर्वेक्षण केले आहे. पाण्याचे नमुनेही काल आणि आज घेऊन लॅबला पाठवले आहे.
- राखी माने, पालिका आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT