बार्शी : येथील रहिवाशी व माढा तालुक्यातील अंबड येथे कार्यान्वित असलेल्या प्रकाश बाविस्कर या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी बार्शी पंचायत समिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावून त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय असहकार आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. बार्शी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील अत्यावश्यक बाजू वगळता सर्व कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच पंचायत समितीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ऑडिट, घरकुलाची कामे पूर्ण करा, असा त्रास देऊन कामाचा ताण दिला जात असल्याने ग्रामसेवक तणावाखाली येऊ लागले आहेत. त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे. दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व त्यांच्या सोबत असलेल्या इतर अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे, जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना अजिबात घाबरू नका. त्यांना लाच लुचपतच्या ताब्यात द्या, सर्वांनी संघटित होऊन वरिष्ठांच्या अशा प्रवृत्तीला विरोध करू, असा निर्धार निषेध बैठकीत करण्यात आला. आजारी असल्याचे सांगूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्रास दिल्याने ग्रामपंचायत अधिकारी टोकाचे पाऊल उचलत आहेत, असे यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.