Solapur News | उद्यापासून दहिगाव योजनेचे आवर्तन : आ. पाटील Pudhari Photo
सोलापूर

Solapur News | उद्यापासून दहिगाव योजनेचे आवर्तन : आ. पाटील

करमाळा मतदारसंघात लाभक्षेत्रातील गावांना नियोजनबद्ध पध्दतीने पाणी दिले जाईल

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन गुरुवार, दि. 26 जूनपासून सुरू होणार असून भीमा सीना बोगद्यातून आजपासून पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले की, आजमितीस उजनी धरणात 73 टक्के पाणीसाठा आहे. यात दररोज हजारो क्युसेकने वाढ होत आहे. पूर्वभागातील तसेच सीना माढा बोगद्याकाठच्या शेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर आपण उजनी धरण लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांच्याशी चर्चा केली व आवर्तनाची मागणी केली. यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून आवर्तन देण्यासाठी नियोजनास तयारी सुरू केली. करमाळा तालुक्यातील पूर्व भागात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण मध्यम असल्याने या आवर्तनातून लाभक्षेत्रातील तलाव, बंधारे, नाला बिल्डींग, कोप बंधारे, शेततळी, ओढे आदी पाणी साठ्यात पाणी दिले जावे, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिली आहे.

तसेच दहिगाव येथील पंप हाऊस एक व कुंभेज येथील पंप हाऊस दोनमधील सर्व दहा पंप हे पूर्ण क्षमतेने चालवून किमान 120 क्युसेक विसर्ग प्राप्त केल्यास मोठे तलाव भरण्यासाठी वेळ जाणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही सूचित केल्याचे सांगितले. मागील आवर्तनातील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करुन येथुन पुढील सर्व आवर्तने ही पूर्ण क्षमतेनेच दिली जावीत, अशी सूचना तांत्रिक व इलेक्ट्रिक विभागास दिली आहे. यामुळे या आवर्तनाचा जादा लाभ करमाळा तालुक्यातील वंचित गावांना दिला जाईल. तसेच वडशिवणे तलावात चारीच्याही अडचणी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. तरी सीना माढा बोगदा व दहिगाव उपसा सिंचन या दोन्ही माध्यमांतून करमाळा मतदारसंघात लाभक्षेत्रातील गावांना नियोजनबद्ध पध्दतीने पाणी दिले जाईल, असेही आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT