करमाळा : तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या 4 महिन्यांपासून काही लोकांनी बंद पाडले आहे. या कामाचे पाईप दुसर्यांदा 8 मे रोजी जाळण्यात आले. आतापर्यंत 28 लाखांचे पाईप जाळण्यात आले आहेत.
या घटनेबाबत करमाळा पोलीस ठाण्यात दोन वेळेस एफआयआरही दाखल झाला आहे. परंतु अद्यापही आरोपी मोकाटच आहेत. प्रशासनाच्या या कुचकामी धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून येत्या 16 मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना अवताडे म्हणाली की, यापूर्वी दहिगाव योजनेचे 14 फेब्रुवारी रोजी 15 लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले होते. पुन्हा 8 मे रोजी 13 लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले आहेत.
आरोपींना अटक करण्यासाठी 16 मे रोजी अर्जुन नगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, करमाळा तहसीलदार ,करमाळा पोलीस स्टेशन यांना दिलेल्या आहेत.