सोलापूर : सायबर गुन्हेगारांनी सोलापूर खणीकर्म कार्यालयास दणका देत त्यांच्या खात्यातून तीन लाख ९२ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. अजून आठ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. याबाबत फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा खणीकर्म अधिकारी निलिमा जाधव या कार्यालयात बसल्या असता त्यांना कार्यालयाच्या मेलवर मॅसेज आला की, निखील कुमार यांना तीन लाख ९२ हजार रुपये व सात्विक चटर्जी यांना आठ लाख ५५ हजार रुपये अदा करण्यात येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अमरनाथ भिंगे यांना घेऊन स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेत धाव घेतली. या दोघांना कोणतेही चेक दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु तोपर्यंत निखील कुमार याच्या ॲक्सिस बँक, राजाबाजार ब्रॅन्च, पटणा, बिहार या खात्यावर तीन लाख ९२ हजार रुपये पाठविण्यात आले होते तर चटर्जी याच्या नावाने दुसरा बनावट चेक देऊन आठ लाख ५५ हजार रुपये काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले.
निखील कुमार याचे ॲक्सिस बँकचे अकाउंट सिल करण्यात आले. त्यावर रक्कम शिल्लक आहे. दरम्यान अमरनाथ स्वामीनाथ भिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निखील कुमार व चटर्जी यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. सायबर गुन्हेगारांनी जिल्हा खणीकर्म कार्यालयाच्या खात्यातून बनावट चेकव्दारे पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.