सोलापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रूझर जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात तीन महिला ठार तर 11 जण जखमी झाले. शनिवारी (दि. 21) सकाळी साडेअकराच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात चिवरी फाट्यावर हा अपघात झाला. पूजा हरी शिंदे (30, रा. उळे, ता. द. सोलापूर) सोनाली माऊली कदम (22, रा. हडपसर, पुणे) व साक्षी बडे (19, रा. हडपसर, पुणे) अशी मृत महिलांची नावे आहेत. अपघातातील जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगावातील रहिवासी आणि त्यांचे नातेवाईक क्रूझरमधून (एमएच 24 व्ही 4948) चिवरी तसेच अणदूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास चिवरी फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने क्रूझरला धडक दिली. त्यानंतर क्रूझरचे टायर फुटून ती डिव्हायडरला धडकून उलटली. यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 11 जण जखमी झाले. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी गाडी सरळ करून जखमींना बाहेर काढले. महिलांचे मृतदेह, जखमींच्या किंकाळ्या आणि लहान मुलांच्या रडण्याने तेथील वातावरण गंभीर बनले होते. नागरिकांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींवर सोलापुरात उपचार सुरु आहेत. उळे गावातील लोकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.