सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करुनही अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू न झाल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पीक कर्ज मिळण्याची शक्यता धूसर बनत चालली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या 28 हजार 916 शेतकऱ्यांचे कर्ज थकले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या योजनेचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा अहवाल एप्रिलच्या पंधरवड्यात अपेक्षित असला तरी विलंबाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कर्जमाफीचा लाभ नेमका केव्हा मिळणार आणि नवीन पीककर्ज वाटप कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने वेळेत कर्ज न मिळाल्यास पेरणी नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्जमाफीच्या निकषात किती शेतकरी पात्र उरतात, हे तूर्तास अनिश्चित आहे. कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने थकबाकीदार शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी कर्जाचा भरणा केला नाही. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज रकमेसह व्याजाचा अतिरिक्त भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची स्थिती, कर्जरचना, बँकांचा सहभाग आणि कर्जमाफीचा आर्थिक परिणाम यांचा अभ्यास करण्याचे मोठे आव्हान समितीसमोर आहे. अहवाल तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नवीन पीककर्ज वाटप सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
कर्जमाफीच्या निकषांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये धाकधूक आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये जाचक अटीमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. यावेळीही कठोर निकष राहिल्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर राहावे लागू शकते.
डीसीसी बँक जिल्हानिहाय थकबाकीदार संख्या
उत्तर सोलापूर - 777, दक्षिण सोलापूर - 2560, पंढरपूर - 2454,
सांगोला - 1170, माळशिरस - 2104, बार्शी - 2155,
करमाळा - 5692, मोहोळ - 1879, माढा - 4179,
अक्कलकोट - 2821, मंगळवेढा - 3125 असे एकूण 28916.