Crop Damage  
सोलापूर

Solapur Crop Damage : जिल्ह्यात आठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

प्रशासनाने पाठविला १ हजार १६७ कोटींच्या नुकसानीचा अहवाल; ९ लाख २० हजार शेतकरी बाधित

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : खरीप हंगाम २०२६ मध्ये कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या खंडामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ लाख २० हजार ४२३ शेतकरी बाधित झाले आहेत. तर एकूण ८ लाख २ हजार ८३५.१७ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.

बाधित शेतकऱ्यांसाठी अपेक्षित मदत निधीचा अंदाज १ हजार १६७ कोटी ४७ लाख रुपयांहून अधिक आहे. त्याबाबतच अहवाल जिल्हा अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला. पहिल्या टप्प्यातील अहवालात दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बाधित क्षेत्राची माहिती संकलित करण्यात आली आहे. जिरायत, बागायत आणि फळपिकांचे नुकसान अहवालानुसार, कडधान्य पिके सोडून जिरायत पिकांखालील तीन लाख १३ हजार ६८३.७७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ३ लाख ९ हजार ३६२ शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. या क्षेत्रासाठी अपेक्षित निधी २६६ कोटी ६३ लाख रुपये आहे.

बागायती पिकांखालील ३ लाख ६३ हजार १८४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ४ लाख ५१ हजार ८६४ शेतकरी बाधित आहेत. या पिकांसाठी ६१७ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीचा अंदाज आहे.फळपिकांखालील १ लाख २५ हजार ९६७.४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, १ लाख ५९ हजार १९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी अपेक्षित निधी २८३ कोटी ४२ लाख रुपये आहे.

माढा, बार्शी, करमाळ्यात मोठे बाधित क्षेत्र

बार्शी तालुक्यात सर्वाधिक १ लाख १ हजार ४२१.८४ हेक्टर बाधित क्षेत्राची नोंद आहे. माढा तालुक्यात ८१ हजार ५१७ हेक्टर, करमाळा तालुक्यात ८२ हजार ८० हेक्टर, मोहोळमध्ये ८५ हजार २१७.२६ हेक्टर आणि अक्कलकोटमध्ये ८५ हजार ३२२.६० हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे अहवालात नमूद आहे. सांगोला तालुक्यात ७७ हजार ८६४.८९ हेक्टर, पंढरपूरमध्ये ७० हजार ४२९.०१ हेक्टर, मंगळवेढ्यात ६२ हजार ३८४.७७ हेक्टर, दक्षिण सोलापुरात ३४ हजार ७९८.३७ हेक्टर, उत्तर सोलापुरात २७ हजार ३७८.२० हेक्टर, अक्कलकोटच्या आकडेवारीनुसार ८५ हजार ३२२.६० हेक्टर, तर माळशिरस तालुक्यात ६८ हजार ४३.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT