सोलापूर : शहरातील महावीर चौक येथे सिग्नलवर लहान बालकांना भीक मागायला लावणाऱ्या महिलेवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिस दलातील दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना महावीर चौकात एक महिला व तिच्यासोबत तीन बालके भीक मागत असताना दिसले. तिच्याकडे चौकशी केली असता तिचे नाव जैताबाई महादेव पवार (वय 40, रा. पारधी वस्ती, जुना विजापूर नाका, सोलापूर) असल्याचे सांगितले. तिला ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
तीनही बालकांना बालगृहात ठेवण्यात आले तर जैताबाई पवार हिच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती येळे यांच्या पथकाने केली.