दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे चुलत्याने आपल्या अवघ्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकल्या पुतण्याचा गळा दाबून खून केला. मंद्रुप पोलिसांनी आरोपीला अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
समर्थ कास्तार (वय ५) असे मृत मुलाचे नाव आहे. अंकुश परशराम कास्तार (वय २५, रा. हलसंगी, ता. तडी, जि. विजयपूर, कर्नाटक) असे अटक केलेल्या चुलत्याचे नाव आहे. खुनाची ही घटना शनिवारी घडली होती.
समर्थ हा बरूर येथे आजी शोभा बगले यांच्याकडे राहत होता. घराजवळच त्याचा काका अंकुशही राहत होता. शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास अंकुशने समर्थला घरी बोलावले. समर्थही काकाकडे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. थोड्यावेळाने अंकुशने समर्थला बेशुद्धावस्थेत उचलून आणत तो पत्र्यावरून पडल्याचे सांगितले. समर्थच्या डोक्यावर व हनुवटीवर जखमा, गळ्यावर काळे व्रण होते. समर्थला तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर समर्थला गळा दाबून मारल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, मंद्रूप पोलिसांनी तांत्रिक माहिती, स्थानिक माहितीदार आणि गोपनीय यंत्रणेच्या मदतीच्या आधारे अंकुश कास्तारची चौकशी केली असता त्याने आपण समर्थचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, पोलिस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संदीप काशीद, सहा. फौजदार बापू शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग कॉन्स्टेबल लखन पवार, माजिद शेख, अश्फाक मियावाले, किरण तोडेकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल श्रीशैल शिवणे, बरूर गावचे पोलिस पाटील श्रीशैल स्वामी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.