बार्शी : गांजाप्रकरणी आणखी दोन आरोपी पकडण्यात आले. या आरोपीसमवेत पोलिस अधिकारी व कर्मचारी. Pudhari Photo
सोलापूर

Solapur Crime: गांजा प्रकरण; आणखी दोघे ताब्यात

भोयरेच्या उपसरपंचाला पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : बेकायदेशीर पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी आणखी दोन आरोपीला धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथून अटक करण्यात आली असून, त्यामुळे अटक आरोपींची संख्या तीनवर पोहचली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, पो. नि. बालाजी कुकडे, सपोनि दिलीप ढेरे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसने, सुधीर गुळमे, दत्तात्रय भालेराव, अरुण डुकळे आदी उपस्थित होते.

शंभर-दीडशे किलो गांजा असावा, असा अंदाज असताना पूर्ण ट्रकभर गांजा सापडला, असेही जिल्हा पोलिस प्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले. बार्शी ते आगळगाव जाणार्‍या रस्त्यावर भोयरे शिवारात गावच्या उपसरपंचाला यापूर्वीच अटक केली होती. बार्शी येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती बागडे यांनी त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. उपसरपंच अंकुश दशरथ बांगर असे मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी बालाजी कदम व कृष्णा दुरगुडे (दोघे रा. तेरखेडा) या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. अद्यापही एक आरोपी फरार आहे.

ट्रकमधून गांडूळ खताची वाहतूक होत असल्याचे दाखवत गांडूळ खतासोबत गांजाच्या गोण्या भरून तो विक्री करण्याच्या उद्देशाने आणला होता. तसेच कंटेनरमधून हा गांजा आयशर टेम्पोमध्ये भरला जात होता. दरम्यान तालुका पोलिसांनी छापा टाकून एक कोटी 38 लाख 40 हजार रुपये किंमतीचा गांजा व 25 लाख रुपये किंमतीची तीन वाहने तालुका पोलिसांनी जप्त केली होती.

यांनी केली कामगिरी

पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसने, धनराज केकाण, अभय उंदरे, अरूण डुकळे, सागर शेंडगे, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, राहुल बोंदर, पोकाँ उत्तरेश्वर जाधव, मंगेश बोधले, शैलेश शिंदे, ओमप्रकाश दासरे, धनराज फत्तेपूर, वैभव भांगे, रतन जाधव, सुनील सरडे, रमेश माने, तानाजी डाके, वैभव माळी यांनी कामगिरी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT