सोलापूर : मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून सोन्याची चेन हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री विजापूर रोडवर घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. कोयत्याने वार झाल्याने तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याला वाचविण्यासाठी मैत्रिणीने अर्धा किलोमीटर पायपीट करत मदत मिळवली.
व्यंकटेश संजय बुधले (वय 29, रा. भारती विद्यापीठजवळ, जुळे सोलापूर) याने नवीन दुचाकी घेतली होती. दुचाकीवरून मैत्रिणीसोबत तो फेरफटका मारण्यासाठी विजापूर रोडवर गेला होता. सोरेगाव हद्दीतील एका हॉटेलपासून काही अंतरावर दोघेही दुचाकीवरून सोलापूरकडे येत होते. यावेळी तिघांनी त्यांना अडविले. सोन्याची चेन देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी झटापट झाली, तिघातील एकाने व्यंकटेश याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याची चेन हिसकावून नेली, तर मैत्रिणीची चेन अंधारात पडली. घाबरलेल्या मैत्रिणीने हॉटेलपर्यंत जाऊन मदत मागितली.
त्यानंतर लोक धावत आले आणि त्यांनी व्यंकटेश याला रूग्णालयात नेले. याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक सुशांत कराळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.