सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावच्या हद्दीत बनावट विदेशी दारूच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क आणि मंद्रूप पोलिस ठाण्याने संयुक्त कारवाई करत मोठा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा साथीदार फरार झाला.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, २७ सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामीण पोलिसांनी नांदणी गावच्या हद्दीतील ‘हॉटेल निसर्ग’च्या पाठीमागे असलेल्या एका पत्राशेडवर छापा टाकला. या ठिकाणी नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट विदेशी दारूची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अण्णाराय बसप्पा भूती (मूळ रा. माशाळ, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, सध्या रा. नांदणी, सोलापूर) याला घटनास्थळावरून अटक केली तर, त्याचा साथीदार सचिन राठोड उर्फ कृष्णा राठोड हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघांवर मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गणेश शिंदे, देविदास करंडे, अविनाश घाडगे, एस बी शेळके, राम निंबाळकर, गणेश गोले, शिवकुमार कांबळे, गणेश पाटील, निखिल जानकर, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, कपिल स्वामी यांनी पार पाडली.
साहित्य जप्त केले
बनावट रॉयल स्टॅग व्हिस्की (१८० मि.ली.): ३८४ बाटल्या
बनावट इम्पेरियल ब्लू व्हिस्की (१८० मि.ली.) : १४४ बाटल्या
बनावट रॉयल चॅलेंज व्हिस्की (१८० मि.ली.): ४८ बाटल्या
रिकाम्या बाटल्या (१ लिटर क्षमता): २५० नग
रॉयल स्टॅग व्हिस्कीचे बनावट बुचे (Caps): २०० नग
एक दुचाकी वाहन आणि एक मोबाईल फोन