सोलापूर

Solapur Crime: पोलिसांनी 36 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले

मुंबईतून आणून सोलापुरात होत होती विक्री

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुंबईतून मेफॅड्रीन (एमडी) ड्रग्ज आणून तो सोलापुरात विक्री करणाऱ्या पुण्याच्या आरोपीस सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. एसटी स्टॅण्ड परिसरात छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाख आठ हजार रुपये किंमतीचे 36 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मोहम्मद अझहर हैदरसाहेब कुरेशी (वय 37, रा. भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट कॅम्प, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईकरिता सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शामकांत जाधव आणि बापू साठे यांना माहिती मिळाली की, शहरातील एस.टी. स्टॅण्ड परिसरात एक इसम अंमली पदार्थाचा साठा घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहे. त्या अनुषंगाने जाधव आणि त्यांच्या पथकाने एसटी स्टॅण्ड परिसरातून त्या इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 36 ग्रॅम पांढरी पावडर जप्त केली. फॉरेन्सिक टिमने त्या पावडरची तपासणी केली असता ते एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. मोहम्मद कुरेशी याच्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतून सोलापुरात केली जात होती विक्री

मोहम्मद अझहर हैदरसाहेब कुरेशी हा मूळचा पुण्यातील रहिवासी आहे. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने मुंबई येथून हे ड्रग्ज सोलापुरात विक्रीसाठी आणले असल्याची कबुली दिली. त्यामुळे मुंबईतून त्याने कुणाकडून ड्रग्ज खरेदी केले, सोलापुरात कुणाला याची विक्री होणार होती, याचा तपास पोलिस करीत आहेत. सोलापूरसारख्या छोट्या शहरातही ड्रग्ज सापडत असल्याने याची पाळेमुळे खोदण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT