तडीपार Pudhari File Photo
सोलापूर

Solapur Crime: गुन्हेगारीवर पोलिसांचा दणका; तिघे दोन वर्षांसाठी तडीपार

खून, चोरी, घरफोडी, महिला अत्याचारासह विविध गुन्ह्यांतील आरोपींवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाकर उर्फ मोन्या प्रकाश माने, अरबाज शेखलाल शेख आणि लखन गोकुळ परदेशी या तिघांना सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

प्रभाकर उर्फ मोन्या प्रकाश माने (वय ३१, रा. कल्याण नगर भाग १, जुळे सोलापूर) याच्याविरुद्ध २०२३, २०२४ आणि २०२६ या कालावधीत खून, महिला अत्याचार व चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

अरबाज शेखलाल शेख (वय २९, रा. जवाहर नगर, आर. के. हॉलजवळ, शेळगी) याच्याविरुद्ध २०२५ व २०२६ मध्ये आपखुशीने दुखापत करणे, घातक शस्त्राच्या साहाय्याने मारहाण करणे, सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासंदर्भातील गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्‍या वतीने त्‍याच्‍या तडीपारीचा प्रस्‍ताव होता.

लखन गोकुळ परदेशी (वय ३४, रा. विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक २) याच्याविरुद्ध २०१६, २०१९, २०२० आणि २०२६ या कालावधीत आपखुशीने दुखापत करणे, सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, चोरी व घरफोडीसारखे गुन्हे दाखल आहेत. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या वतीने त्‍याच्‍या तडीपारीचा प्रस्‍ताव सादर केला होता. या तीनही प्रस्‍तावाच्‍या अनुषंगाने पोलिस उपायुक्‍त प्रीतम यावलकर यांनी तिघांना सोलापूर शहर व जिल्‍ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केले.

या तीनही कारवायांमुळे शहरातील सराईत व वारंवार गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवायांना वेग देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT