टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास तीन जणांनी गच्ची पकडून दगड, काठी व लाथा-बुक्क्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आलेगाव बु.(ता.माढा) जवळ घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत.
पोकॉ महेंद्र अशोक शेटे(वय 29) असे जखमी पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्यांनी फिर्याद दिली आहे. तर रवींद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर (दोघे रा. आलेगांव, ता.माढा) व रामचंद्र तुकाराम चंदनकर यांचा जावई (अनोळखी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी महादेव तुपसौंदर (रा. आकुंबे, ता. माढा) यांनी त्यांच्या जिवितास धोका आहे, पोलिस मदत पाहिजे, असे कळविले होते. त्यानुसार पोकॉ महेंद्र शेटे हे आलेगावला आले होते. तेथे ते तुपसौंदर यांच्यासोबत बोलत असताना चारचाकी गाडीतून रवींद्र रामचंद्र चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर, रामचंद्र तुकाराम चंदनकर यांचा जावई (नाव माहीत नाही) हे आले. त्यांनी शेटे यांची गच्ची पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.खाली पाडून लाथा-बुक्क्याने मारहाण केली.
तसेच काठीने उजव्या हातावर मारहाण करून त्यांच्यातील एकाने जिवे ठार मारण्याच्या उद्देेशाने मोठा दगड घेऊन डोकीत मारला. ते रक्तबंबाळ झाले. डोकीत दगडाचा मार लागल्याने चक्कर आल्याने खाली बसले असता त्यांच्यातील दोघांनी त्यांना धरले व एकाने या पोलिसाला जिवंत सोडावयाचे नाही, असे म्हणून त्यांना दगड मारले. ते दगड त्यांनी हुकवले. त्यावेळी पोलिसाला ड्रेसवर मारत असल्याने लोकांनी त्यांना सोडविले. गर्दी वाढू लागल्याने ते तिघेजण निघून गेले.
तीनही आरोपी फरार
पोकॉ महेंद्र शेटे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना केली आहेत. अधिक तपास सपोनि प्रशांत मदने हे करीत आहेत.