सोलापूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत एका महिलेसह चार सराईत गुन्हेगारांना सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
दीपक मोहन जाधव (वय 25, रा. सेटलमेंट कॉलनी, सलगर वस्ती, सोलापूर), सचिन कलप्पा व्हनमाने (27, रा. कल्याण नगर, जुळे सोलापूर), कपिल ज्ञानेश्वर भांडेकर (27, रा. वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर), फरजाना अब्बास शेख (42, रा. गोदुताई विडी घरकूल, सोलापूर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गेल्या केवळ दोन दिवसांत तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या सातवर पोहोचली आहे.
दीपक मोहन जाधव : याच्यावर 2011 ते 2025 या प्रदीर्घ कालावधीत महिला अत्याचार, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता सदर बझार पोलीस ठाण्याकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
सचिन कलप्पा व्हनमाने : याच्यावर 2012 ते 2024 या काळात घरफोडी करणे, तसेच घातक शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्याने तडीपारीची शिफारस केली होती.
कपील ज्ञानेश्वर भांडेकर : याच्यावर 2017 ते 2025 दरम्यान सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी करणे आणि खंडणी मागणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून त्याचा तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
फरजाना अब्बास शेख : ही महिला गुन्हेगार असून, तिच्या विरोधात 2024 व 2025 या वर्षात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणे आणि सामान्य नागरिकांचे पाकीट चोरणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. सदर बझार पोलिसांनी तिच्या तडीपारीचा प्रस्ताव दिला होता.