सोलापूर : महापालिका निवडणूक सुरू असताना शहरात दोन देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसांसह तिघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दोघे कर्नाटकातील तर एकजण पुण्याचा रहिवासी आहे. हे पिस्टल नेमके कशासाठी सोलापुरात आणले याची चौकशी सध्या पोलिस करीत आहेत.
लालसाब जातगर ऊर्फ मनगोळी ( वय 26, रा. जातगर वस्ती, सिंदगी, विजयपूर, कर्नाटक), राजा नुरजानसाब सौदागर (26, रा. भारत नगर, सिंदगी, विजयपूर, कर्नाटक) आणि प्रदीप सूर्यकांत काळभोर (35, रा. लोणी स्टेशनजवळ, लोणी कारभोर, पुणे) अशी अशी तिघा संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल संताजी रोकडे व भारत पाटील यांना माहिती मिळाली की मध्य रेल्वे कार्यालयाजवळील मैदानात तीन इसम संशयितरीत्या फिरत असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. ही माहिती गुन्हे शाखेचे व. पो. निरीक्षक अरविंद माने यांना दिली. त्यांनी तातडीने सहा. पो. निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाला घटनास्थळी पाठवले. त्या ठिकाणी एका मोटारसायकलसह तिघे संशयित आढळले. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्टल व आठ जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल असा एकूण दोन लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यातील लालसाब मनगोळी याच्यावर दरोड्याचा तर राजा सौदागर याच्यावर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत. प्रदिप काळभोर याच्यावर हत्यार, ड्रग्जसह खुनाचा गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, व.पो. निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय काळे, संताजी रोकडे, भारत पाटील, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिध्दराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, सतिश काटे, बाळू काळे यांनी पार पाडली.