करमाळा : शहरातील कुंटणखाण्यावर करमाळा पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली आहे. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. भरदिवसा कारवाई झाल्यामुळे करमाळा शहरांत खळबळ उडाली आहे. ही कारवाई दि. 20 जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भवानी पेठ येथील श्री कमलाभवानी लॉज येथे करण्यात आली.
प्रथमेश सुनील राठोड (वय 22 रा. भवानी पेठ, करमाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने यांना करमाळा शहरातील भवानी पेठ येथील श्री कमलाभवानी लॉज येथे एक इसम अवैध कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिनगारे, दादासाहेब वाडगे, हवालदार भाऊराव शेळके, आप्पासाहेब लोहार, मिलिंद दहिहांडे, स्वप्नील शेरखाने व शीतल पवार यांचे पथक तयार करण्यात आले.
दोन पंच व बनावट गिर्हाईकासह कमलाभवानी लॉजमधील खोलीत छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांना वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत वेश्याव्यवसाय करणार्या तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी संशयित आरोपी प्रथमेश सुनील राठोड याने लॉज हे त्यांच्याच मालकीचे असल्याचे सांगून त्यामध्ये महिलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. त्याला प्रत्येक गिर्हाईकामागे 500 रुपये मिळत असल्याचे त्याने सांगितले. राठोड विरुद्ध हवालदार भाऊराव उत्तरेश्वर शेळके यांनी फिर्याद दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने हे करीत आहेत.