Solapur crime news 
सोलापूर

Solapur crime news | स्कार्पिओ गाडीची काच फोडल्याच्या किरकोळ कारणावरून एकाचा खून

बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पोखरापुर : स्कार्पिओ गाडीची काच फोडल्याच्या कारणावरून एकाला २१ फेब्रुवारी रोजी दोघांनी काठीने मारहाण करत शिवीगाळ केली होती. त्या घटनेच्या पहाटे तीन वाजल्यापासून संबंधित व्यक्ती बेपत्ता होता. अखेर त्यांचा मृतदेह २४ फेब्रुवारी सकाळी ११ वा.च्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील वाळूज गावच्या हद्दीमध्ये नदीपात्रात आढळून आल्याची घटना घडली.

या प्रकरणी तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय भागवत जगझाप असे खून झालेल्याचे नाव आहे. दीपक कोळी व भुजंग कोळी या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील विजय भागवत जगझाप हे आई-वडील पत्नी दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी मजुरीच्या कामासाठी मुलांना घेऊन पुणे येथे गेली होती. दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दीपक कोळी व भुजंग कोळी दोघे (रा. दहिटणे ता. बार्शी) यांच्या स्कार्पिओ गाडीची काच फोडल्याप्रकरणी विजय यास दोघांनी काठीने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यानंतर विजय यांचा भाऊ योगेश जगझाप यांनी दीपक कोळी व भुजंग कोळी या दोघांना तुमच्या गाडीचे नुकसान भरून देतो असे सांगितले होते. व विजय या समजावून सांगून एका खोलीमध्ये बसवून बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर योगेश याला झोप लागली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याला जाग आल्याने तो विजय यास बघण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या रूमला बाहेरून लावलेली कडी उघडी दिसली व विजय हा त्या रूममध्ये नव्हता. त्याची सर्वत्र शोधाशोध केली.

दरम्यान विजयाची पत्नी पुण्यावरून आल्यानंतर त्यांनी विजयची शोधाशोध केली व दीपक कोळी, भुजंग कोळी यांच्याकडे विजय बाबत चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांनी कोमल विजय जगझाप यांना जातिवाचक शिवीगाळ करून तुझ्या नवऱ्याने आमच्या गाडीची काच का फोडली? असा जाब विचारत त्याला उद्याचा दिवस दिसू देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर जगझाप कुटुंबीयांनी दि. २३ फेब्रुवारी रोजी वैराग पोलीस ठाण्यात विजय जगझाप यांची हरवल्या बाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही त्यांचा शोध चालूच होता. दरम्यान दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांचे प्रेत मोहोळ तालुक्यातील वाळूच्या नदी मध्ये आढळून आले.

याप्रकरणी कोमल विजय जगझाप रा. दहिटणे ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक कोळी, भुजंग कोळी व निर्मला कोळी यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT