गुळवंची : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एका स्टील कंपनीच्या ड्रायव्हरवर गोळीबार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना जेरबंद केले असून, गुन्हा करण्यासाठी वापरलेली चारचाकी कार आणि २ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. न्यायालयाने सर्व आरोपींना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
'अॅपेक्स स्टील अँड हार्डवेअर' कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच दरोडेखोरांना पैशांच्या देवाणघेवाणीची पूर्ण माहिती (टीप) पुरवली असल्याची धक्कादायक माहिती गुन्ह्याचा गुन्ह्याचा समोर आली आहे. पोलिसांनी बोरामणी गावातून या फितूर कर्मचाऱ्याला शोधून काढून १७ जुलै रोजी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला आज (दि.१८) कोर्टात हजर केले असता, २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, १५ जुलै रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास 'अॅपेक्स स्टील अँड हार्डवेअर' कंपनीचे दिवसभराचे कलेक्शन घेऊन ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी (वय ३७, रा. कर्णिकनगर, सोलापूर) हे कंपनी मालकाच्या घराकडे निघाले होते. सोलापूर-हैदराबाद हायवे रोडजवळ एका कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. त्यापैकी एकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून दोन राऊंड फायर केले. या गोळीबारातील छरे छातीच्या उजव्या बाजूला लागून ड्रायव्हर तांबोळी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी तात्काळ ३ तपास पथके तैनात केली. यादरम्यान तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा दरोडा बोरामणी येथील इसमांनी केला असून ते सध्या बोरामणी येथेच आहेत. पोलिसांनी सापळा रचून १६ जुलै रोजी ४ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात एकूण ८ आरोपींचा सहभाग असून त्यापैकी १६ जुलै रोजी अटक केलेल्या ४ आरोपींना कोर्टाने आधीच २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम (तपास अधिकारी), पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सपोफौ विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे आणि सायबर पोलीस ठाण्याचे निखिल पवार यांनी केली आहे.
तीन आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यात एकूण ८ आरोपींचा सहभाग असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित ३ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.