बार्शीत आमदार सोपल यांच्या बंगल्यावर भिरकावल्या आदल्या 
सोलापूर

Dilip Sopal : बार्शीत आमदार सोपल यांच्या बंगल्यावर भिरकावल्या आदल्या

कंपाऊंडमधील झाडे जळाली, ८ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगाव रोडवरील ‘सोपल बंगला’ या निवासस्थानी मध्यरात्री पेटत्या आदल्या टाकून आग लावल्याचा प्रकार घडला. या घटनेत परिसरातील झाडे आणि सोलर पॅनलचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. बार्शी शहर पोलिस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाथा मोहिते, योगेश लोढे, अशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे (सर्व रा. लहूजी चौक व राऊतचाळ, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सुधीर सोपल (वय ७८, रा. सोपल बंगला, आगळगाव रोड, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुधीर सोपल हे २३ जून रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास घरी झोपले असताना घराच्या मागील बाजूस असलेल्या बी.टी.एम. पॅव्हेलियन मैदानाच्या दिशेने पेटत्या आदल्या घराकडे येऊन पडू लागल्या. आदल्यांच्या आवाजाने त्यांना जाग आली. खिडकीतून पाहिले असता परिसरातील झाडांना आग लागल्याचे दिसले. कर्मचारी गुरुपादय स्वामीही जागे झाले. त्यानंतर कंपाऊंडच्या भिंतीवरून नाथा मोहिते (रा. टिळक चौक) आणि योगेश लोढे (रा. लहूजी चौक) हे दोघे घरात घुसून आदल्या पेटवताना दिसले. सोपल यांना पाहताच ते दोघे शिडीवरून पळून गेले. त्याचवेळी स्वामी यांचा मुलगा ओंकार याने बाहेर पाहिले असता अशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते आणि अंबादास रणझुंजारे हे सर्व लहूजी चौक व राऊतचाळ, बार्शी येथील रहिवासी बाहेरून आदल्या पेटवून घराच्या दिशेने फेकत होते. घटनास्थळी एक रिक्षा आणि तीन मोटारसायकलीही होत्या.

सोपल आणि स्वामी यांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना कळवले. अग्निशमनच्या जवानांनी आग विझवली. एकूण दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आरोपींनी जिवाला धोका निर्माण करण्याच्या आणि घर स्फोटकांनी जाळण्याच्या उद्देशाने ही आग लावली. घटनेच्यावेळी आमदार दिलीप सोपल, त्यांचा मुलगा योगेश, सून उज्ज्वला आणि नातू आर्यन हे घराबाहेर होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT