Solapur Crime News | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास जन्मठेपेची शिक्षा File Photo
सोलापूर

Solapur Crime News | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास जन्मठेपेची शिक्षा

मदत करणार्‍यास तीन वर्षे सक्तमजुरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्यावर वारंवार अत्याचार करणार्‍या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि 17 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेला पळवून नेण्यासाठी मदत करणार्‍यालाही न्यायालयाने तीन वर्षे सशक्त कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रोहित ऊर्फ रोहन मारुती बनसोडे (वय 24, रा. बापूजी नगर, जय भारत शाळा, स्लॉटर हाउस झोपडपट्टी, सोलापूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार सुमित शशिकांत काटकर (वय 19, रा. राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर) याला न्यायालयाने तीन वर्षे सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

पिडीत अल्पवयीन मुलगी 2020 मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना शिकवणीसाठी जात होती. सोशल मिडीयावरील इन्स्टाग्राम अ‍ॅपवर तिची रोहित बनसोडे याच्याशी ओळख झाली. रोहितने तिच्याशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. रोहितने पिडीतेला त्याच्या आईला भेटायला जाऊ असे सांगून त्याच्या दुचाकीवरून हैदराबाद रोडवरील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी पिडीतेवर जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर त्याने पिडीतेला तिचे व्हिडिओ शुटींग व फोटो काढल्याचे सागूंन ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिचा छळ करीत पैसे, सोन्याचे दागिनेही घेतले.

16 मे 2021 रोजी रोहित याने सुमित काटकर याच्या मदतीने पिडीतेला दुचाकीवरून पळवून नेले. पिडीतेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाण केली. पिडीतेच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक वाय. एस. गायकवाड यांनी तपास करून पिडीतेला शोधून काढले. रोहित बनसोडे, सुमित काटकर यास अटक केली. तपासामध्ये पिडीतेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यामध्ये पोक्सो, बलात्काराचे कलम वाढविण्यात आले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीने पिडीतेवर फक्त शारीरिक अत्याचार केला नाही तर अनेकवेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले. साक्षीदार व पिडीतेची साक्ष, पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी रोहित बनसोडे यास जन्मठेप व सुमित काटकर यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे अ‍ॅड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. ईस्माईल शेख, अ‍ॅड. पी. जी. देशमुख यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT