श्रीपूर : महाळुंग (ता. माळशिरस) हद्दीतील मायनर येथे शाळेत जाणाऱ्या इयत्ता आठवीतील १३ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जीवन जयवंत घाडगे (वय ३०, रा. महाळुंग-मायनर) याच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
महाळुंग-मायनर येथील १३ वर्षीय मुलगी श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. बुधवार (दि. २४) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे घरून शाळेकडे पायी निघाली होती. यावेळी आरोपी जीवन घाडगे हा मोटरसायकलवर येऊन म्हसोबा मंदिराजवळील रस्त्यावर तिला अडवून तिच्याशी गैरवर्तन करू लागला. तसेच तिला उसाच्या शेतात ओढून नेण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, संबंधित मुलीने धाडस दाखवत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून थेट घर गाठले. घरी परतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या थोरल्या बहिणीला सांगितला. त्यानंतर ती शाळेत गेली असता, शाळेतही तिने हा प्रकार शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी तात्काळ मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून घेतले. मुलीने आई-वडिलांसमोरही संपूर्ण घटना सांगितल्यानंतर त्यांनी तिला अकलूज पोलीस ठाण्यात नेऊन फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून जीवन जयवंत घाडगे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे करत आहेत.