Murder Pudhari
सोलापूर

Solapur Crime: प्रेयसीच्या पतीचा चाकूने वार करुन खून

मोबाईल सुरू असताना कुटुंबियांनी ऐकला आवाज

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रेयसीच्या पतीवर भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) रात्री अक्‍कलकोट रोड एमआयडीसी येथे घडली. या हल्ल्यात मध्यस्थी करायला गेलेले मृताचे भाऊजीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला असून संशयित आरोपी संतोष महादेव पाटील याला अटक करण्यात आली आहे.

सिद्धाराम कैलास कटप (वय २०, रा. आकाशवाणी केंद्र, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धाराम हा रिक्षाचालक आहे. त्‍याचा एक वर्षापूर्वी श्रृती हिच्‍याशी विवाह झाला होता. संशयित आरोपी संतोष महादेव पाटील (वय २३, रा. कलावती नगर, सोलापूर) याच्‍याशी तिचे विवाहपूर्व संबंध होते. शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आरोपी संतोषने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीसमोर भेटायला बोलावले. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्‍यानंतर आरोपी संतोषने चाकूने सिद्धारामवर थेट हल्ला चढवत एकापाठोपाठ एक सपासप वार केले.

सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सिद्धारामला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे भाऊजी प्रमोद पाटील यांच्यावरही आरोपीने चाकूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी लागलीच संशयित आरोपी संतोष पाटील याला अटक केली. याबाबत श्रृती सिद्धाराम कटप हिने दिलेल्या फिर्यादीवरुन संतोष पाटील याच्‍या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT