सोलापूर : घरफोडी प्रकरणातील संशयितांसह पोलिस कर्मचारी. 
सोलापूर

Solapur Crime : कासेगावातील घरफोडीचा छडा; दोघे अटकेत, ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून तपासाला दिशा;

पुढारी वृत्तसेवा

कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर): येथे २४ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कासेगाव येथे २४ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी तीन ते चार घरांमध्ये घरफोडी करून चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, घटनेच्या वेळी तीन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आल्या. या फुटेजच्या आधारे त्यांच्या हालचालींचा माग काढण्यात आला.

दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे नितीन बाबू भोसले, कमलाकर यशवंत पवार आणि विरप्पा चंदू शिंदे (रा. बिस्मिल्लानगर, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांची नावे तपासात समोर आली. त्यानुसार पोलिस पथकाने बिस्मिल्लानगर, मुळेगाव येथे शोध घेतला असता नितीन बाबू भोसले आणि कमलाकर यशवंत पवार हे मिळून आले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी कासेगावातील घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान त्यांच्याकडून ३ ग्रॅम ४८ मिली सोन्याचे दागिने, २० हजार रुपये रोख, तीन हजार रुपये किमतीच्या इरकल साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप आणि पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भिमगोंडा पाटील तसेच संबंधित अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT