करमाळा : तालुक्यातील वरकुटे येथील माहेर असलेल्या शुभांगी गरड ( वय ४० ) या विवाहितेने सासरच्या मंडळी कडून हुंडा मागणीसह शारीरिक,मानसिक त्रास दिल्याने कंटाळून तिने पुणे येथील चंदननगर भागात राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मयत शुभांगी आणि अभिजीत गरड यांचा विवाह जुलै २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळानंतरच सासरच्या मंडळींकडून शुभांगीला संसारोपयोगी साहित्य, भांडी आणि हुंड्यावरून अपमानास्पद वागणूक देणे, पतीकडून दुर्लक्ष करणे, खाण्यापिण्यावर बंधन घालणे तसेच घरातील किरकोळ कारणांवरून सासू, सासरा, दीर व जाऊ कडून तिचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने सततच्या त्रासामुळे शुभांगी प्रचंड तणावाखाली होती.
१३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शुभांगी आणि तिच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. पतीने दुर्लक्ष करत घराबाहेर पडल्यानंतर, मानसिक त्रास असह्य झाल्याने शुभांगीने चंदननगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी शुभांगीच्या सासर कडील अभिजीत दिलीप गरड (पती ),दिलीप गरड (सासरे),अनिता दिलीप गरड (सासू),अक्षय दिलीप गरड (दीर),प्रियंका अक्षय गरड (जाऊ) या पाच जणाविरुद्ध कलम १०८ आत्महत्येस प्रवृत्त करणे व कलम ८५ छळ करणे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पती अभिजीत गरड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी मृत शुभांगीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केली आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.