बीबीदारफळमध्ये विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 
सोलापूर

Solapur News : अन्‌ ‘सुदामा’ची ठरली ‘ती’ शेवटचीच अंघोळ

बीबीदारफळमध्ये विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मृत्यू कधी, कुठे आणि कशा प्रकारे येईल याचा काही नेम नसतो, याची प्रचिती उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे आली. नियोजित लोडशेडिंग सुरू होण्याच्या अवघ्या दहा मिनिटांपूर्वी विजेचा धक्का लागून सुदाम तुकाराम माने (वय ५०, रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम माने हे रविवारी (दि. २८) पहाटे नेहमीप्रमाणे साडेपाचच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करून ते वाळत घातलेले कपडे घेण्यासाठी गेले. सकाळी सुमारे ५.५० वाजता त्यांनी वायरला हात लावताच त्यामध्ये विजेचा प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का बसताच ते जागीच कोसळले. घटनेनंतर त्यांच्या पत्नी व मुलाने तातडीने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, परिसरात दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत नियोजित लोडशेडिंग असल्याने लाईट बंद होते. ही घटना घडली तेव्हा वीजपुरवठा बंद होण्यास अवघे दहा मिनिटे बाकी होती. काही मिनिटांआधी वीज गेली असती, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशी हळहळ ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद सोलापूर शासकीय रुग्णालय पोलिस चौकीत झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT