करमाळा : करमाळा तालुक्यातील वीट येथे अवैधरीत्या चालणार्या कुंटणखान्यावर छापा टाकून करमाळा पोलिसांनी कुंटणखाना चालवणार्या एकास अटक केली असून, तीन मुलींची सुटका केली आहे. त्यांना न्यायालयाच्या आदेशाने सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
संतोष रोहिदास जगदाळे (वय 41, रा. वीट) असे अटक केलेल्या कुंटणखाना चालवणार्या चालकाचे नाव आहे. त्याला बार्शी सत्र न्यायालयाने बुधवारपर्यंत (7 मे) पोलिस कोठडी ठोठावली आहे. करमाळा पोलिस ठाण्याचे महेश हंबीरराव डोंगरे यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. करमाळा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, मौजे वीट गावच्या शिवारात एक इसम अवैध कुंठणखाना चालवित आहे.
त्यामुळे रणजित माने यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा म्हस्के, पोलिस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव, सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपटराव टिळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिनगारेंसह पोलिस पथकाने पाझर तलावाजवळ बनावट गिर्हाईक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकला. वेश्याव्यवसाय करणार्या तीन मुलींची सुटका केली. तसेच पीडित महिला यांना मे. कोर्ट बार्शी येथे हजर करून, त्यांना सोलापूर येथे पाठविले आहे.