सोलापूर

Solapur Ganja Seizure : तब्‍बल ९७ किलो गांजा पकडला

शहर गुन्हे शाखेची भारतनगरात कारवाई; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भारतनगर परिसरात कारवाई करून तब्बल ९६ किलो ९१० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची किंमत ४८ लाख ४५ हजार रुपये असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्‍हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांचे पथक २८ ऑक्‍टोेबर रोजी कुमठा नाका येथील क्रीडा संकुलाजवळ गस्‍त घालत होते. यावेळी पोलिस अंमलदार भारत पाटील यांना क्रीडा संकुलाजवळील भारत नगर येथे एका घरासमोर एक इसम पिशवीत संशयास्‍पद वस्‍तू भरताना आढळून आला. त्‍याने स्‍वतःचे नाव मुजम्मिल अल्ताफ शेख (वय २०, रा. भारतनगर) असे सांगितले. त्याच्याजवळ काळा ओलसर बोंडे असलेला गांजा आढळून आला. घरझडतीत प्‍लॅस्‍टिक टेपने रॅप केलेली गांजाची ४८ पाकिटे एकूण ४८ लाख ४५ हजार रुपयांचा ९६.९१ किलो गांजा आढळून आला.

घरातच निलोफर इरफान शेख (वय ३९) ही महिला आढळून आली. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलिस आयुक्‍त दिलीप पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, शबनम शेख, सपोनि शंकर धायगुडे, तुकाराम घाडगे, भारत चंदनशिवे, पोलिस अंमलदार भारत पाटील, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, राजकुमार वाघमारे, काशीनाथ वाघे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, विजयकुमार वाळके, संजय साळुंखे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, सुभाष मुंडे व पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT