Gun Firing Pudhari
सोलापूर

Solapur Crime: गोळीबार करून अडीच लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न

कामगार जखमी; मुळेगाव येथील घटना, तिघे संशयित पसार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कंपनीची अडीच लाखांची रोकड लुटण्याच्‍या प्रयत्नात तिघांनी कारमधील कामगारावर रिव्‍हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्याची घटना सोलापूर- हैदराबाद रोडवरील मुळेगाव येथे घडली.

यामध्ये कामगार एजाज नबीलाल तांबोळी (वय ३७, रा. कर्णिकनगर, सोलापूर) हे छातीत गोळीचे छर्रे घुसून जखमी झाले. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. दरम्यान, गोळीबारानंतर तांबोळी यांनी प्रसंगावधान राखून गाडी मागे घेत कंपनीत नेली. त्‍यामुळे रोकड वाचली.

मौजे मुळेगाव येथे इब्राहिम मोतीवाला यांची ॲपेक्‍स स्टील ॲण्ड हार्डवेअर ही कंपनी आहे. बुधवारी (दि.१५) रात्री साडेनऊच्‍या सुमारास वसुली झालेली दोन लाख ५० हजारांची रक्‍कम घेऊन एजाज हे मालक मोतीवाला यांच्‍या घराकडे कंपनीच्‍या कारमधून जात होते. कंपनीपासून दोनशे मीटरवर सोलापूर-हैदराबाद रोडलगत ते आले असता दुसऱ्या कारमधून आलेल्या तिघांनी त्‍यांना अडवले. दोघे कारमधून खाली उतरले. त्‍यांनी कंपनीची वसूल झालेली रक्‍कम मागत तांबोळी यांच्यावर रिव्‍हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या.

गोळीचे छर्रे तांबोळी यांच्‍या छातीत लागून ते जखमी झाले. तरीही ते कारसह कंपनीत आले. तर संशयित पळून गेले. या घटनेची माहिती मोतीवाला यांना दिली. सोलापूर तालुका पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. या प्रकरणाचा अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT