Solapur civic action Pudhari
सोलापूर

Solapur civic action: पोटफाडी ते जोडबसवणा चौक मार्गावर धडक कारवाई

15 अतिक्रमणे जमीनदोस्त; उर्वरितांना दिली अंतिम 24 तासांची मुदत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील पोटफाडी चौक ते जोडबसवणा चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने शनिवारी धडक मोहीम राबवत कठोर कारवाई केली. रस्त्याच्या कडेला तसेच पुढे भक्कम बांधकाम करून मोठ्या प्रमाणात जागा व्यापण्यात आल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली.

महापालिकेच्यावतीने संबंधित अतिक्रमणधारकांना यापूर्वीच 24 तासांची मुदत देण्यात आली होती. याबाबत स्पीकरद्वारे वारंवार जाहीर सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे अतिक्रमणधारकांनी दुर्लक्ष केल्याने शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पोलिस बंदोबस्तात जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत तब्बल 15 ठिकाणांवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अनेकांनी रस्त्यालगत भक्कम बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे दिसून आले. मोहीम सुरू असताना परिसरातील काही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत नुकसान न करता स्वतःहून अतिक्रमण काढण्याची विनंती केली.

या मार्गावर जवळपास 50 ते 60 अतिक्रमणे असल्याची माहिती समोर आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT