सोलापूर

Solapur Crime: गावठी पिस्‍टल, जिवंत काडतूस हस्‍तगत

साडेपाच लाख रोख रक्कम जप्त; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करीत पिस्‍टल बाळगणाऱ्या संशयित आरोपीस अटक केली. त्‍याच्‍याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि पाच लाख ५० हजारांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्‍त केला. रोहित रघुनाथ अहिरे (वय २० रा. पंढरपूर सध्या रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्‍या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकातील पोलिस अंमलदार सुहास अर्जुन यांना गोपनीय माहिती मिळाली की, नितीननगर येथील कोंड्याल शाळेमागील परिसरात एका तरुणाकडे निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगमध्ये गावठी पिस्टल आहे. त्‍यानंतर पोलिसांनी सापळा रचून रोहित अहिरे यास ताब्‍यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि रोख पाच लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली. ही रोकड, पिस्टल आणि काडतुसे त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याने काही दिवसांपूर्वी ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले.

प्रदीपच्या वडिलांना कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्याने पोलिसांकडून घराची झडती होण्याची शक्यता असल्यामुळे हा मुद्देमाल स्वतःकडे ठेवण्यास दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी रोहित अहिरे याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला असून प्रदीप हुसेनी गायकवाड याचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. बिराजदार, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिध्द निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिघोळे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT