सोलापूर : बजेटच्या बैठकीत बसलेले नगरसेविकेचे पती. (दुसऱ्या, तिसऱ्या छायाचित्रात) ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधींनी फोटो काढताना बैठकीतून नगरसेविकेच्या पतीने बैठकीतून काढता पाय घेतला.  
सोलापूर

Solapur News : बजेटच्या बैठकीत नगरसेविकांच्या पतींची लुडबूड

‌‘पुढारी‌’प्रतिनिधीने छायाचित्रण सुरू करताच पतींचा बैठकीतून काढता पाय; नियमांकडे प्रशासनाचा कानाडोळा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या बजेट आढाव्यासाठी सुरू असलेल्या बैठकीत नगरसेविकांच्या पतींची लुडबुड उघडकीस आली. यामुळे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दै. ‌‘पुढारी‌’ च्या प्रतिनिधीने छायाचित्रण करण्यास सुरुवात करताच काही नगरसेविकांच्या पतींनी बैठकीतून काढता पाय घेतला.

महापालिकेत सध्या बजेट लगबग चालू आहे. 30 मार्चच्या सर्वसाधारण सभेत बजेटला मान्यता दिली जाणार आहे. सोमवार 23 मार्चपासून विभागनिहाय आढवा घेतला जात आहे. सहा दिवस विविध विभागनिहाय बजेटचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. यासाठी नगरसेवक आणि नगरसेविकांना उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत काही नगरसेविकांच्या पतींनी उपस्थित राहून थेट सहभाग घेतल्याचे दिसून आले. अनेक जण बैठक कक्षात बसून चर्चेत लक्ष घालत असल्याचे निदर्शनास आले.

नियमांनुसार, नगरसेविकांच्या कामकाजात त्यांच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप करणे नियमबाह्य आहे. अशा प्रकारची ढवळाढवळ झाल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईची तरतूद आहे. तरीही या स्पष्ट नियमांकडे दुर्लक्ष करून पतींची उपस्थिती दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त, उपायुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते उपस्थितीत असताना नगरसेविकांच्या उपस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कोणत्याही अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला नाही. दरम्यान दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधींनी छायाचित्रण करण्यास सुरुवात करताच काही नगरसेविकांच्या पतींनी बैठकीतून काढता पाय घेतल्याचेही दिसून आले. त्यामुळे हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT