सोलापूर : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवार दि. 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत जाहीर केली. महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 26 प्रभाग आणि 102 सदस्यपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. 102 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी अरक्षित आहेत. यंदा ओबीसीची एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे आरक्षणानंतर कही खुशी कही गम असे चित्र दिसून आले.
महिलांच्या 51 जागांमध्ये 15 जागा अनुसूचित जातीसाठी तर 27 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी तर दोन जागा दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
अनुसूचित जाती एकूण 15 जागा (8 महिला आरक्षित), अनुसूचित जमाती एकूण दोन जागा (एक महिला राखीव), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) एकूण 27 पैकी 14 महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण 58 जागांपैकी
28 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. तरी एकूण 102 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी आहेत.
हुतात्मा स्मृती मंदिरात अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, सहायक आयुक्त गिरीष पंडित, रामचंद्र पेंटर, महेश क्षीरसागर, ओमप्रकाश बिराजदार, प्रवीण दंतकाळे नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. महापालिका शाळा क्रमांक दोन मधिल प्रसाद इंगळे, कार्तिक गायकवाड, साक्षी वठार, अनुष्का वठार यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात दि. 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन महानगरपालिका आयुक्त हे दि. 25 नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर या कालावधीत निर्णय घेणार असून अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात सादर करण्याची अंतिम मुदत दि. 2 डिसेंबर आहे.
राज्य निवडणूक आयोगानी दिलेल्या सूचनेनुसार सुरुवातीला तीन सदस्यांचे दोन प्रभाग आहेत. प्रभाग क्र. 25 व 26 पैकी कोणत्या प्रभागात महिलांच्या दोन जागा देय होतील व कोणत्या प्रभागात महिलांची एक जागा देय होईल हे सोडतीने निश्चित करण्यात आले. प्रभाग 25 ची चिठ्ठी काढण्यात आली. तिथे दोन महिला जागा राखीव निश्चित केले गेले. त्यानंतर प्रभाग 26 मध्ये तीनपैकी एक जागा महिला आरक्षित करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षण प्रक्रिया राबवली. उतरत्या क्रमाने लोकसंख्येप्रमाणे जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक एक, दोन, चार, पाच, सहा, तेरा ,15, 16, 17, 21, 22, 23, 24 , 25, 26 अशा एकूण आरक्षित 15 जागांचा समावेश आहे. ड्रममधून अनुसूचित जातीसाठीच्या 15 पैकी आठ चिठ्ठ्या महिलांसाठी काढण्यात आल्या. एससी महिला राखीवमध्ये प्रभाग क्रमांक 13, 15, 4, 6 ,21, 25 आणि 17 अशा चिठ्ठ्या निघाल्या आहेत.
हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडलेल्या या आरक्षण सोडती प्रसंगी इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रत्येक सोडती प्रसंगी उत्सुकता शिगेला जात होती. काही ठिकाणी आरक्षण जैसे थे पडल्याने इच्छुकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेवक अरुण भालेराव, विजयी इपाकायल, शौकत पठाण, विनोद इंगळे यांच्यासह राजकीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
2017 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत ओबीसींसाठी एकूण 28 जागा होत्या. त्यापैकी 14 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. तर यंदाच्या 2025 च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज झालेल्या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यांच्यासाठी 27 जागा असल्याचे दिसून आले. मागील निवडणुकीच्या तुलनेत ओबीसींची एक जागा कमी आहे. तर मागील निवडणुकीत सर्वसाधारण जागा 57 होत्या आणि यंदा त्या 58 आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमा नुसार कमी झाल्याचे महापालिका आयुक्तांनी जाहीर केले. प्रसार माध्यमांनी याचे कारण विचारताच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यावर आयुक्त अधिकाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करत होते. माजी नगरसेवक प्रभाकर जमागुंडे यांनी याबाबत शंक व्यक्त केली आहे.
अनुसूचित जमातीसाठी (एसटी) प्रक्रिया घेतली. 24 ब अनुसूचित जमाती महिला आणि 26 ब अनुसूचित जमाती असे आरक्षण निश्चित करण्यात आले. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) एकूण 27 जागापैकी प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे 25 जागांचे प्रभागनिहाय वाटप करण्यात आले. उर्वरित 2 जागा सोडतीने निश्चित केल्या. दरम्यान ओबीसी महिलांसाठी प्रभाग क्रमांक 14, 19, 1, 2, 5, 16, 22, 23, 12, 9, 3, 8, 11, 6 या एकूण 14 जागा आरक्षित झाल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक 10, 18 आणि 20 या तीन प्रभागात प्रत्येकी तीन महिला जागा आरक्षित झाले आहेत.