सोलापूर

Solapur Theft : कॉपर वायर चोरीचे सहा गुन्हे उघड; १.८८ लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलर प्लेट व केबल चोरीतील आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सौरऊर्जा प्लांट तसेच नदीकाठच्या विद्युत पंप व पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत समाधान नवनाथ पवार (वय २१, रा. रानमसले, ता. उत्तर सोलापूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १ लाख ८८ हजार रुपयांची १४५ किलो कॉपर वायर असा जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे कॉपर वायर चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प, विद्युत पंप व पानबुडी मोटारींमधील कॉपर वायर चोरीच्या वाढत्या घटनांची उकल करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकास सूचना केल्या होत्‍या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रानमसले येथे समाधान पवार हा साथीदारासह सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्‍यानुसार पोलिसांनी रानमसले येथील घराजवळून पवार याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता, प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेली कॉपर वायर आढळून आली. त्‍याच्‍याकडे कौशल्याने तपास केला असता त्‍याने चोरीची कबुली दिली. त्यातून वैराग पोलीस ठाण्यात एक, माढा पोलीस ठाण्यात दोन आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तीन, असे कॉपर वायर चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. समाधान पवार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांच्यासह नारायण गोलेकर, धनाजी गाडे, नागेश कोणदे, मोहन मनसावाले, दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतीश बुरकुल, कपिल काटकर, अश्विनी गोटे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT