सोलापूर : मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच कृतिका नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रोहिणी नक्षत्रातील पावसाची संततधार सुरूच आहे. या संततधार पावसाने सोलापूर शहर चिंब चिंब भिजून गेले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पुष्य आणि पुनर्वसू नक्षत्रासारखे पाऊस पडत असल्याचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत.
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे 10 मे पासून वाळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी रात्री रोहिणी नक्षत्रातील पावसाला सुरुवात झाली असून, हवामान विभागाने मंगळवारी (दि. 27) मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी पावसाने उघडीप देतील असे वातावरण असतानाच पुन्हा 11 वाजलेनंतर आभाळ भरून आले. दुपारी दीड वाजलेनंतर शहरात पावसाची संततधार सुरूच राहिली.
हवामान खात्याकडे सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 2.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दि. 25 मे रोजी 28.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यात सोमवारी तापमानात 2 अंशानी वाढ होत 30.8 अंश तापमान नोंदला गेला. सततच्या कोसळधारेने उसंत न घेतल्याने पुष्य आणि पुनर्वसू नक्षत्रातील फिल सोलापुरकरांना अनुभवायला येत आहेत.
उजनी धरणातील पाणी पातळी आज मंगळवारी पहाटेच प्लसमध्ये येणार आहे. मागील चोवीस तासात उजनीत 6.54 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. रविवारी सायंकाळी उजनी धरणात 54.58 टिएमसी म्हणजे वजा 16.94 टक्के पाणीसाठा होता. रात्री उशिरा 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दौंडमधून उजनी धरणातून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पर्यंत उजनीतील पाणीपातळी झपाट्याने वधारून 6.54 टीएमसी पाणीसाठा वाढला. सायंकाळी 6 वाजता दौंडमधून 19 हजार 328 क्युसेक पाण्याचा विसर्ग येत आहे. कालव्यातून विसर्ग बंद करण्यात आले असून, भीमा सीना कालव्यातून 160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.