महूद : शेतातून उसाची एक ट्रॉली बाहेर काढून दुसऱ्या ट्रॉलीची रस्त्याच्या डाव्या बाजूला वाट पहात उभ्या असलेल्या ऊस तोडणी मजुरांना मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोन तरुण ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्या एका जणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या विदारक अपघातांमध्ये इतर तिघेजण बाजूला पळून गेल्याने त्यांचे प्राण या अपघातातून वाचले. अपघातात मृत्युमुखी पडलेले हे ऊसतोड मजूर जालना जिल्ह्यातील आहेत. हा अपघात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास महूद-अकलूज रस्त्यावर घडला.
सुदाम राठोड (वय ३१, रा. श्रीराम तांडा पांगरी गोसावी, ता. मंठा, जि. जालना) आणि भीमा मुंढे (वय २०, रा. वडरवाडी परतुर, जि. जालना) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. सुशांत सुभाष घाडगे (रा. जिंती नाका, मलठण, फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. या अपघाताबाबत कृष्णा चव्हाण (रा. श्रीराम तांडा, पांगरी ता. मंठा, जि. जालना) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. हे ऊसतोड कामगार चिकमहूद येथील प्रताप पाटील यांच्याकडे गेल्या एक महिन्यापासून ऊस तोडणीचे काम करत आहेत. ही ऊस तोडणी मुजरांची टोळी महूद शिवारातील ईश्वर कोळेकर यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम करत होती.
बुधवारी ईश्वर कोळेकर यांच्या शेतातील ऊस तोडणी केली होती. हा ऊस दोन ट्रॉल्यांमध्ये भरलेला होता. परंतु शेतातून एकावेळी दोन्ही ट्रॉली रस्त्यावर येणे शक्य नसल्याने त्यातील एक ट्रॉली ट्रॅक्टरला जोडून शेतातून बाहेर काढली.
ही ट्रॉली महूद ते अकलूज रस्त्याच्या डाव्या बाजूला आणून लावली होती. तेव्हा दुसऱ्या ट्रॉलीची वाट पहात पहिल्या ट्रॉलीच्या मागे कृष्णा चव्हाण, त्यांचा मेहुणा सुदाम पंडित राठोड, भीमा प्रकाश मुंढे, संतोष आत्माराम मोगल, अर्जुन प्रकाश मुंढे असे पाचजण उभेे होते. कंटेनर दोघांना धडकल्यानंतर पुढे जाऊन उसाने भरलेल्या ट्रॉलीलाही धडकला. त्यामुळे उसाची ट्रॉली पलटी झाली तर कंटेनर त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या केळीच्या बागेत जाऊन अडकला. या अपघातात आयशर कंटेनर चालक सुशांत सुभाष घाडगे (रा. जिंती नाका, मलठण, फलटण, जि. सातारा) हा देखील जखमी झाला आहे.
दोन्ही मयत ऊसतोड कामगारांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुदाम राठोड व भीमा मुंढे यांच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून हे दोन्ही ऊसतोड कामगार भूमिहीन आहेत. त्यांच्या पाठीमागे दोन-दोन लहान मुलं आहेत.