सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने तर उपसभापती भाजपचे सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली. नवीन पदाधिकार्यांची नावे अक्कलकोट येथे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी झालेल्या बैठकीत अंतिम झाली.
बहुचर्चित सोलापूर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड प्रक्रिया रविवारी (दि. 11) बाजार समितीच्या सभागृहात झाली. सकाळी नऊच्या दरम्यान माजी आ. दिलीप माने, सुरेश हसापूरे, श्रीशैल नरोळे, अविनाश मार्तंडे, इंदुमती अलगोंड-पाटील, सुनील कळके, प्रथमेश पाटील, सुभाष पाटोळे, नागण्णा बनसोडे, अनिता विभूते, उदय पाटील, गफार चांद, मुश्ताक चौधरी, वैभव बरबडे आदी नवनिर्वाचित संचालकांची आ. कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट येथील आपल्या घरी बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित संचालकांशी झालेल्या चर्चेअंती सभापती पदासाठी माजी आ. दिलीप माने व उपसभापती पदासाठी आ. कल्याणशेट्टी समर्थक भाजपचे कळके यांचे नाव निश्चित झाले. यानंतर सर्व संचालकांसह आ. कल्याणशेट्टी बाजार समितीच्या कार्यालयात आले.
सभापती माजी आ. माने व उपसभापती पदासाठी कळके यांचेच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदावरील निवडी या बिनविरोध झाल्या. यावेळी माने व कळके यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. निवड जाहीर होताच सभापती व उपसभापती यांच्या समर्थकांनी ढोलताशा वाजवत मोठा जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी नवीन पदाधिकार्यांचा सत्कार केला.
भाजपचे मनिष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी व अतुल गायकवाड हे संचालक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यावर हाजार समितीत आले. या तिघाही संचालकांचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली.
महाआघाडी करण्यात हसापुरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. सभापती व उपसभापतीची निवड जाहीर होताच सत्काराची औपचारिकता झाल्यावर हसापूरे व समितीचे माजी उपसभापती श्रीशैल नरोळे गुलालापासून दूर राहिले.
अक्कलकोट येथील बैठक व सभापती निवडीकडे माजी सभापती तथा स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी पाठ फिरवली. जागा वाटपात त्यांना दुय्यम स्थान मिळाल्याचे शल्य आजच्या त्यांच्या अनुपस्थितीतून जाणवले. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
अक्कलकोट येथील बैठक व सभापती निवडीकडे माजी सभापती तथा स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी पाठ फिरवली. जागा वाटपात त्यांना दुय्यम स्थान मिळाल्याचे शल्य आजच्या त्यांच्या अनुपस्थितीतून जाणवले. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.