सोलापूर : मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचा पंचनामा होऊन मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेल्यानंतर दीड महिन्यात नुकसानभरपाई देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सरकारचे गतिमान काम यातून दिसून येत आहे.
आता खरीप हंगामातील पिके जोमात आलेली असतानाच मे महिन्यातील पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने शेत लागवडीसाठी हाती पैसे उपलब्ध होणार असल्याने बाधित शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, यासाठी शेतकर्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेसप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत दिली जाते.
फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकर्यांना मदत देण्यासाठी 337 कोटी 41 लाख 53 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने 22 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. मदत निधी डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्याच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे दिले जाणार आहे.
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
केंद्र शासनाने 12 नैसर्गिक आपत्तींचा नुकसानभरपाईसाठी समावेश केला आहे. याव्यतिरिक्त राज्य शासनाने दि. 30 जानेवारी 2014 रोजी अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणार्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले. त्यानंतर दि.22 जून 2023 रोजी शासनाने सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली. त्यामुळे बाधित शेतकर्यांनाही त्याची मदत होत आहे.