Solapur Weather Pudhari
सोलापूर

Solapur Weather : सोलापूर गारठले!

यंदाच्या मोसमातील नीचांकी १३.४ अंश तापमानाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून शुक्रवारी यंदाच्या हिवाळी मोसमातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अचानक वाढलेल्या थंडीमुळे पहाटेपासूनच शहरवासीयांना हुडहुडी भरली. शहरांसह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या असून दिवसभरही हवेत गारवा कायम राहिल्याने सोलापूरकर चांगलेच गारठले आहेत.

शुक्रवार (२० नोव्हेंबर) रोजी कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवेतील आर्द्रता ३८ टक्के असून, कमाल आणि किमान तापमानातील मोठ्या तफावतीमुळे सकाळी आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. पहाटेच्यावेळेस एलकेजी, यूकेजी, शाळकरी मुलांना शाळेत जाताना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला.

पहाटे पाच वाजल्यापासून शहरातील चौक, वसाहती आणि रस्त्यांच्या कडेला नागरिकांनी शेकोट्या पेटविल्या. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांनी स्वेटर, कानटोपी, मफलर आणि शालींचा आधार घेतला. चहाच्या टपऱ्या आणि वृत्तपत्र विक्री केंद्रांवरही शेकोटीभोवती नागरिकांची गर्दी दिसून आली. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गरम कपडे बाजारात गर्दी

थंडीचा जोर वाढल्याने नवी पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील नेपाळीयन व्यापाऱ्यांकडे स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट आणि अन्य उबदार कपड्यांच्या खरेदीला वेग आला आहे. होटगी रोड, विजयपूर रोड, सात रस्ता परिसरात उबदार कपडे आणि ब्लँकेट विक्रेत्यांकडेही ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT