बार्शी : शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी उजनी धरणाचे पाणी बार्शी तालुक्याला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (दि. २३) तालुक्याचा पाहणी दौरा करून थेट बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. राजेंद्र राऊत, आ. सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार एफ. आर. शेख, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी अशी केली पाहाणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बार्शी तालुक्यातील कुसळंब-धानोरे रोडवरील शेतकरी महिला दमयंती गादेकर यांच्या शेतात सोयाबीन, तूर, उडीद, मका या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पाच हेक्टर ८० आर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली असून एकरी ४० हजार रुपये खर्च आल्याची गादेकर यांनी माहिती दिली. मात्र पावसाअभावी संपूर्ण पीक वाया गेल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तरूणाने मांडली विवाह समस्या
तरुण शेतकरी समाधान शिंदे यांनी पाणी नसल्याने शेतात पीकच येत नाही, त्यामुळे मुलीच्या घरचे लोक लग्नासाठी नकार देतात, अशी अत्यंत वेदनादायी व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
मराठवाड्याच्या लगतच्या भागात उजनी धरणाचे पाणी नेण्याचा प्रयत्न आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या उजनीच्या पाण्याच्या योजनेला नक्कीच मदत केली जाईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. दुष्काळाच्या परिस्थितीबाबत शासन अत्यंत गंभीर असून, बाधित शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद यांसह विविध पिके पावसाअभावी करपून गेल्याचे चित्र आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारंबा येथील शेतकरी अशोक भोरे यांच्या ०.६० आर शेतातील सोयाबीन व उडीद पिकाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
दुष्काळग्रस्त भागातील भीषण परिस्थिती लक्षात घेता, केवळ औपचारिक पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. 'रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून, बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत पोहोचवली जाईल,' असे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राजू खरे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शहाजी पवार, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात १३० दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. काही भागात तुटवडा असला तरी अंतर्गत नियोजनातून तो भागवला जाईल. गरज भासल्यास त्वरित चारा छावण्या सुरू करण्यात येतील. पाणी, चारा आणि आर्थिक मदतीबाबत शासनाचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री