सोलापूर : शहराच्या विकास आराखड्यातील तसेच अक्कलकोट रस्ता, होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार दिला. जिल्हा वार्षिक नियोजन बैठक (राज्यस्तर) गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावरून मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून वाढीव निधी देण्यात यावा. त्याचप्रमाणे अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांकरिता लागणारा निधी 75 टक्के राज्य शासन आणि 25 टक्के उद्योजकांकडून घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय उद्योजकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून 75 टक्के राज्य शासन आणि 25 टक्के जिल्हा नियोजन समिती किंवा महापालिकेकडून घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी फडणवीस यांच्याकडे केली. कोठे यांनी केलेल्या मागणीला तत्काळ मंजुरी देत या मागणीप्रमाणेच निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.
अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील उद्योजकांनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील समस्या सोडविण्याची मागणी केली होती. याप्रकरणी पालकमंत्री गोरे यांनी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचा शब्द उद्योजकांना दिला होता. निवडणुकांच्यावेळीही पालकमंत्री गोरे यांनी अक्कलकोट रस्ता आणि होटगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसह इतर सुधारणांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते.
आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून हा विषय मार्गी लावला आहे. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच अधिकारी उपस्थित होते.