सोलापूर

Solapur News: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील रस्त्यांची दुरवस्था

ठिकठिकाणी भले मोठे खड्डे; स्टेचरवरून रूग्णांना ने-आण करणे झाले अवघड, दुरूस्ती करण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रूग्णालयाच्या आवारातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून यामुळे बाह्यरूग्ण विभागासह ए, बी आणि सी ब्लॉकमध्ये स्ट्रेचरवरून रूग्णांना ने-आण करताना रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसह वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनाही त्रास होत असून शिवाय, स्ट्रेचरही खराब होत आहेत. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

येथील शासकीय रूग्णालयाच्या आवारात अनेक रस्ते आहेत. तीन प्रवेशद्वाराकडून येणारे तीनही रस्ते, उत्तरीय तपासणी विभाग, ए. बी. आणि सी वार्डाकडे जाणारे विविध रस्ते याशिवाय बाह्यरूग्ण विभागासमोरीलही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

या खड्ड्यांचा त्रास हा रूग्णांच्या नातेवाईकांसह येथील कर्मचाऱ्यांना होत आहे. कारण, बाह्यरूग्ण विभागात रूग्णांची डॉक्टरांकडून विविध वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रूग्णांच्या आजारानुसार ए आणि बी वार्डातील आंतररूग्ण विभागात दाखल करावे लागते. खराब रस्त्यावरून स्ट्रेचरवरील रूग्णाला ओढून नेतांना त्रास होत आहे. तसेच, या खराब रस्त्यामुळे स्ट्रेचरचे चाक खराब होऊन निघून पडतात. यासाठी या रूग्णालयात असलेल्या सर्वच रस्त्याच्या नुतनीकरण करण्याची आवश्यकता आहे.

त्रास वाचण्यास होणार मदत

सोलापूर दक्षिण, मध्य आणि उत्तर या तीनही विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. विजयकुमार देशमुख हे करत असून ते भाजपचे आहेत. त्यांनी एकदा येथील शासकीय रूग्णालयाच्या आवारात चक्कर मारल्यास या आवारातील रस्त्यांची अवस्था दिसणार आहे. यासाठी या तीनही आमदारांनी आपली ताकत विधानसभेत खर्ची घातल्यास गरीब रूग्ण नातेवाईकांसह वर्ग चारच्या कर्मचारी यांचा त्रास वाचण्यास मदत होणार आहे.

येथील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खराब झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेविषयीची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. मात्र, अद्यापही त्यावर काहीही हालचाल झालेली नाही. किमान पावसाळ्याच्या पूर्वी तरी या रस्त्यांचे नुतनीकरण केल्यास रूग्णांसह रात्री अपरात्री रूग्णांवर उपचार करण्यासाठी ये- जा करणाऱ्या डॉक्टरांसह सर्वच कर्मचारी व रूग्णांच्या नातेवाईकांचा त्रास वाचणार आहे.
-डॉ. ऋत्निक जयकर, अधिष्ठाता, शासकीय रूग्णालय, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT