Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur News : शहरात तूर्त पाणीकपात नाही

महापौर कोंड्याल : सध्याचेच वेळापत्रक कायम; अपव्यय रोखण्यास स्वतंत्र पथक स्थापणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहराला दररोज आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा सुमारे ३३ एमएलडी पाणी कमी मिळत असले, तरी सोलापूरकरांवर तूर्तास अतिरिक्त पाणीकपात लादली जाणार नाही. शहरात सध्या सुरू असलेले पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कायम ठेवण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

महानगरपालिकेच्या महापौर कक्षात पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस पदाधिकार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहराला पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि पाण्याची नासाडी रोखण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या आकडेवारीनुसार शहराला दररोज सुमारे २४१ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र उजनी आणि हिप्परगा पाणीपुरवठा योजनांमधून सुमारे २०८ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे दररोज सुमारे ३३ एमएलडी पाण्याची तूट निर्माण होत आहे. म्हणजेच शहराला आवश्यक असलेल्या प्रत्येक १०० लिटर पाण्यामागे प्रत्यक्षात सुमारे ८६ लिटर पाणी उपलब्ध होत आहे.

नवीन प्रस्तावित जलसुधार योजनेच्या आराखड्यात सुमारे १२ लाख लोकसंख्या गृहीत धरून पाण्याची गरज निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती वापरासाठी १६२ एमएलडी, तरंगत्या लोकसंख्येसाठी २.८२ एमएलडी, व्यावसायिक वापरासाठी १६.९१ एमएलडी आणि औद्योगिक वापरासाठी २७.५४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. याशिवाय पाणीगळती आणि वितरणातील नुकसान लक्षात घेऊन तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहराची एकूण दैनंदिन पाण्याची गरज सुमारे २४१ एमएलडीपर्यंत पोहोचते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT