सोलापूर : शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने यांत्रिकी स्वच्छतेवर भर दिला असून, शासनाकडून प्राप्त झालेल्या चार यांत्रिकी स्वच्छता वाहनांच्या माध्यमातून दररोज सुमारे १२० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. रात्री १० ते सकाळी ६ यावेळेत ही मोहीम राबविण्यात येत असून, टप्प्याटप्प्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि परिसर स्वच्छ केले जात आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महानगरपालिकेला ही चार वाहने प्राप्त झाली आहेत. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा झाला होता. वाहने नवीन असल्याने शासनाच्या अटी-शर्तींनुसार कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण रात्रीच्या सत्रात देण्यात आले. प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष स्वच्छतेचे कामही सुरू करण्यात आले.
प्रत्येक वाहनाच्या एका शिफ्टमध्ये सरासरी ३० रनिंग किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. यांत्रिकी स्वच्छतेबरोबरच महापालिकेच्या पाण्याच्या टँकरद्वारे प्रमुख रस्त्यांवरील फुटपाथ आणि डिव्हायडर प्रेशरयुक्त पाण्याने धुण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवरील धूळ आणि साचलेली घाण कमी करण्यास मदत होत आहे.