सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या सोलापूर-मुस्ती दरम्यान धावणार्या सिटी बसला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना सोलापूर-हैदराबाद रोडवरील बोरामणी जवळील कीर्ती गोल्ड ऑईल मिल समोर घडली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
यात मिळालेली माहिती अशी की, सोलापूरहून मुस्तीकडे जाणारी सिटी बस दुपारी दोन वाजता निघाली. बोरामणीच्या अलीकडे आली असता, चालकाच्या लक्षात आले की बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली आहे. त्यांनी तत्काळ बस बाजूला घेत प्रवाशांना आधी सुखरूप बाहेर काढले. यानंतर गाडीतले प्रवासी तसेच वाहक व परिसरातील लोकांनी धावाधाव करीत लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आगीने घेतलेल्या रौद्ररूपापुढे ग्रामस्थांचे सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले. यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल झाली. तसेच पोलीस दाखल झाले. सर्वांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु घटनास्थळी वेळेत मदत मिळेपर्यंत बस जळून खाक झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.
बसला नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस घेत आहेत. यामध्ये गाडीचे पूर्णतः तसेच प्रवाशांच्या जवळ असलेल्या महत्त्वाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.