Ujani Project Karmala Protest
करमाळा : उजनी जलाशयावर प्रस्तावित एआय डेटा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेत्यांच्या विरोधात करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कोटलिंग मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. या नेत्यांचा जिवंतपणी दशक्रिया विधी करून तसेच बोंबाबोंब आंदोलन करत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
उजनी जलाशयावर प्रस्तावित चार प्रकल्प विनाशकारी असल्याचा आरोप करत परिसरातील शेतकरी त्यांना कडाडून विरोध करीत आहेत. हे प्रकल्प उजनी जलाशयावर होऊ नयेत, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी-इंदापूर राष्ट्रीय महामार्गावर भिमानगर येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय उजनी धरण परिसरात चटणी-ठेचा आणि भाकरी आंदोलनही करण्यात आले होते.
आंदोलनांची मालिका सुरू असतानाच, प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या शासन आणि नेत्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी चिखलठाण येथील कोटलिंग मंदिर परिसरात दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आले. यावेळी उजनी परिसरातील इंदापूर, भिगवण, टेंभुर्णी आणि करमाळा भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शासन तसेच प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या नेत्यांचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून आणि बोंबाबोंब आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उजनी जलाशयावरील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
उजनी जलाशयावरील डेटा प्रकल्पासह अन्य प्रकल्पांना समर्थन देणाऱ्या शासन आणि सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचा जिवंतपणी प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. बोंबाबोंब आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेला हा रोष आणि आंदोलनाची अनोखी पद्धत करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.