कामती : मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात गावातील प्रमुख चौकात, मारुती मंदिराच्या पाठीमागील जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा शुक्रवारी रात्री उशिरा उभारण्यात आला. ही उभारणी विनापरवानगी झाल्याचे समोर येताच शनिवारी सकाळी प्रशासनात खळबळ उडाली.
संदिप पवार, विशाल पवार उर्फ पप्पू पाटील, संजय आगलावे, अतुल डोके, रणजित पवार, बालाजी गव्हाणे, तानाजी पवार, भैरू भोसले, वैभव माऊली भगरे, माऊली भगरे, घाडगे गुरूजी अशा 11 जणांवर मोहोळ पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. याबाबतची फिर्याद अंकोलीचे ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर जोडमोटे यांनी दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 11 संशयितांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, पुतळा हटवण्याच्या शक्यतेमुळे शिवप्रेमी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. ‘कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचा पुतळा हटवू देणार नाही,’ अशी भूमिका घेत त्यांनी पुतळा परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. तात्पुरता पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवून, आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर पुन्हा त्याच जागी बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, ग्रामस्थ ऐकण्यास तयार नसल्याने अखेर पुतळ्याभोवती पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.