सोलापूर : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने तसेच पाण्याच्या जलस्रोतांमध्ये नवीन पाण्याची आवक झाल्याने लहान मुलांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये सर्दी, ताप, खोकला, जुलाब आणि उलटीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या बालरुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या आजारांच्या रुग्णांमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. पावसामुळे हवेत आर्द्रता वाढत आहे. बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आढळून येत आहेत. लहान मुलांची प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने त्यांना संसर्गाची लागण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पावसाळ्यात जलस्रोतांमध्ये नवीन पाण्याची आवक होते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होऊन ते दूषित होण्याची शक्यता असते.
दूषित पाणी तसेच रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ सेवन केल्याने जुलाब आणि उलटीसारखे आजार होतात. उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने दूषित अन्न-पाण्यातून होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढत आहे. टायफॉइडच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.